Marathi balgeet lyrics - (मराठी बालगीत)

If you are looking for different types of Marathi balgeet lyrics ,(मराठी बालगीत), balgeet marathi lyrics free download then you have come to the right place.


You will find Marathi Balgeet Lyrics , Balgeet Lyrics in Marathi as per the list given below :-  1) Asāvā sundara cŏkalēṭacā baṅgalā, 2) uṭhā uṭhā ci'ūtā'ī, 3) ravivāra mājhyā āvaḍīcā , 4) ēka hōtā kā'ū, 5) sasā tō sasā kī kāpūsa jasā, 6) yērē yērē pāvasā tulā dētō paisā, 7) nāca rē mōrā ambyācyā vanānta, 8) pappā sāṅgā kuṇācē?  Pappā mājhyā mam'mīcē!, 9) Cāndōbā cāndōbā bhāgalāsa kā?, 10) Cāndōbā lapalā jhāḍīta, 11) dhara dhara dharā dhara dhara dharā, 12) dēvā tujhē kitī sundara ākāśa, 13) tujhī ni mājhī jammata vahinī aika sāṅgatē kānāta, 14) baghā baghā kaśi mājhi basali bayā, 15) mī mōṭhṭhā hōnāra kina'ī mī khūpa khūpa śikanāra, 16) vihīṇabā'ī vihiṇabā'ī uṭhā ātā uṭhā, 17) binabhintīcī ughaḍī śāḷā lākhō ithalē gurū, 18) yē rē yē rē pāvasā, rusalāsa kā?, 19) Mājhyā chugaḍīcyā bāhulīcaṁ lagīna, mājhyā chugaḍīcyā, 20) yā rē yā sujana, āpaṇa sārējaṇa karū yā bhajana.

Marathi balgeet lyrics - (मराठी बालगीत)


असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार.
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
'हॅलो हॅलो !' करायला छोटासा फोन.
बिस्कटांच्या गच्चीिवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल.
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो.
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला.
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

  उठा उठा चिऊताई

          उठा उठा चिऊताई
         सारीकडे उजाडले
         डोळे तरी मिटलेले
         अजूनही अजूनही !
         सोनेरी हे दूत आले
         घरट्याच्या दारापाशी
         डोळ्यांवर झोप कशी
         अजूनही अजूनही !
         लगबग पाखरे ही
         गात गात गोड गाणे
         टिपतात बघा दाणे
         चोहीकडे चोहीकडे !
         झोपलेल्या अशा तुम्ही
         आणायाचे मग कोणी
         बाळासाठी चारापाणी
         चिमुकल्या चिमुकल्या !
         बाळाचे मी घेता नाव
         जागी झाली चिऊताई
         उठोनिया दूर जाई
         भूर भूर भूर भूर !


रविवार माझ्या आवडीचा 

एक नाही दोन नाही, बेरीज-वजाबाकी नाही
तीन नाही चार नाही, भुमितीची सजा नाही
दिवस उद्याचा सवडीचा, रविवार माझ्या आवडीचा

सोमवारचा असतो गणिताचा तास
गणिताच्या तासाला मी नापास
गणित विषय माझ्या नावडीचा

भलताच कठीण तो मंगळवार
डोक्यावर असतो भूगोलाचा भार
भूगोल विषय माझ्या नावडीचा

घेऊन तोफा आणि तलवारी
इतिहास येतो बुधवारी
इतिहास माझा नावडीचा

एक होता काऊ

एक होता काऊ, तो चिमणीला म्हणाला
"मला घाल न्हाऊ, घाल न्हाऊ, घाल न्हाऊ"
एक होता पोपट, तो चिमणीला म्हणाला
"तू मला थोपट, तू मला थोपट, तू मला थोपट"
एक होती घूस, ती चिमणीला म्हणाली
"तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस"
एक होती गाय, तिने चिमणीला विचारले
"तुझे नाव काय, तुझे नाव काय, तुझे नाव काय ?"
एक होते कासव, ते चिमणीला म्हणाले
"मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव"


ससा तो ससा की कापूस जसा

ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली
चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहियले
वाटेत थांबले ना कोणाशी बोलले ना
चालले लुटुलुटु पाही ससा
हिरवीहिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा
झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळला मनी होई
'निजला तो संपला' सांगे ससा

 येरे येरे पावसा तुला देतो पैसा.

         येरे येरे पावसा
         तुला देतो पैसा.
         पैसा झाला खोटा
         पाऊस आला मोठा.
         ये ग ये ग सरी
         माझे मडके भरी.
         सर आली धावून
         मडके गेले वाहून.


नाच रे मोरा अंब्याच्या वनांत

नाच रे मोरा अंब्याच्या वनांत
नाच रे मोरा नाच !
ढगांशी वारा झुंजला रे
काळाकाळा कापुस पिंजला रे
आतां तुझी पाळी वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !
झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरलीं रे
पावसांत न्हाऊं काहीतरी गाऊं
करुन पुकारा नाच !
थेंबथेंब तळ्यांत नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !
पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझीमाझी जोडी जमली रे
आभाळांत छान छान सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !

पप्पा सांगा कुणाचे ?  पप्पा माझ्या मम्मीचे !

ल ल्ला लला ललला ल ल्ला लला ललला
पप्पा सांगा कुणाचे ?  पप्पा माझ्या मम्मीचे !
मम्मी सांगा कुणाची ?  मम्मी माझ्या पप्पांची !
इवल्याइवल्या घरट्यात चिमणाचिमणी राहातात
चिमणा चिमणी अन्‌ भवती चिमणी पिल्लेही चिवचिवती !
आभाळ पेलते पंखांवरी पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीनें घास द्यावा पिल्लांचा हळूच पापा घ्यावा !
पंखाशी पंख हे जुळताना चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे हासते छ्प्पर भिंती दारे !

चांदोबा चांदोबा भागलास का?

चांदोबा चांदोबा भागलास का?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का?
निंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी.
आई-बाबांवर रुसलास का?
असाच एकटा बसलास का?
आता तरी परतुनी जाशील का?
दूध न्‌ शेवया खाशील का?
आई बिचारी रडत असेल
बाबांचा पारा चढत असेल.
असाच बसून राहशील का?
बाबांची बोलणी खाशील का?
चांदोबा चांदोबा कुठे रे गेला?
दिसता दिसता गडप झाला.
हाकेला 'ओ' माझ्या देशील का?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?


चांदोबा लपला झाडीत
        
         चांदोबा लपला झाडीत
         आमच्या मामाच्या वाडीत.
         मामाने दिली साखरसाय
         चांदोबाला फुटले पाय.
         चांदोबा गेला राईत
         मामाला नव्हत माहित.

धर धर धरा धर धर धरा

धर धर धरा धर धर धरा
चला ग घुमवू याला जरा गरगर गरा
ह्या आंधळ्यास द्या डोळा
हा सांब सदाशिव भोळा
मी मंतर मारिन काळा..... छू:
अंतर मंतर जंतर मंतर
आले मंतर कोले मंतर
झुम्मक झिय्या काजुच्या बिया
विठोबाचा विठुमियाँ..... छू:
विठुमियाँला या तर बाई
आवडतो पिंजरा
धर धर धरा
तू पकडशील रे ज्याला
तो देइल पेरु तुजला
मग होइल अस्सा खोकला
खोकला खोकला, बक्कन खोकला
टाकला टाकला - किनई भाजीत टाकला
पापडात पापड - पोह्याचे पापड
विठोबाचा आजा माकड
फडफडवी रे तू तर आता पंख आपुले जरा
धर धर धरा
तू गर फेकुनि बी खाशी
जगावेगळी रीत अशी
दांडीवरती डुलकी घेशी
डुल डुल डुलकी वार्‍याच्या झुळकी
चुळ चुळ चुळकी पाण्याच्या चुळकी
कावळ्या कावळ्या काव काव
आंधळ्या आंधळ्या धाव धाव
पळा पळा रे हा तर आला घुम्मत घुम्मत भोवरा
धर धर धरा


देवा तुझे किती सुंदर आकाश

देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे
सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे
किती गोड बरे गाणे गाती
सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी
इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील

तुझी नि माझी जंमत वहिनी ऐक सांगते कानात

तुझी नि माझी जंमत वहिनी ऐक सांगते कानात
आपण दोघी बांधू या ग दादाचं घर बाई उन्हात
उगाच करतो खोडी ग, मलाच म्हणतो वेडी ग
तुला चिडवितो, मला रडवितो आणिक हसतो गालात
खेळ मला ग आणी ना, साडी तुजला देईना
ऐट दाखवी वरती आणिक सदा तो अपुल्या तोर्‍यात
वहिनी का ग हिरमुसली ? नकोच का शिक्षा असली ?
फितूर होशिल दादाला ही शंका येते मनात

बघा बघा कशि माझि बसलि बया.

या बाइ या,
बघा बघा कशि माझि बसलि बया.
ऐकु न येते,
हळुहळु अशि माझि छबि बोलते.
डोळे फिर्वीते,
टुलु टुलु कशि माझि सोनि बघते.
बघा बघा ते,
गुलुगुलु गालातच कशि हसते.
मला वाटते,
इला बाइ सारे काहि सारे कळते.
सदा खेळते,
कधि हट्ट धरुनि न मागे भलते.
शहाणि कशी,
साडिचोळि नवि ठेवि जशिच्या तशी.

मी मोठ्ठा होनार किनई मी खूप खूप शिकनार

मी मोठ्ठा होनार किनई मी खूप खूप शिकनार
भारत माझी आई, आईचे सार्थक मी करणार !
घरात आई धडा शिकवते, शिवरायाची गोष्ट सांगते
शिवरायाच्या जशी चालवीन शत्रुवर तलवार
शाळेच्या वर्गाचे गुरुजी, त्यांची माझ्यावरती मर्जी
शिकवितात ते अक्षर-संख्या, एक-दोन-तीन-चार
मित्रांसंगे गिरवीन ग-म आणि आईचे करीन काम
आई-बाबा त्यांना माझा तीनदा नमस्कार
खूप शिकून मी मोठ्ठा होईन, डॉक्टर होउनी औषध देईन
सैनिक आणि गरिबांसाठी धावून मी जाणार

विहीणबाई विहिणबाई उठा आता उठा

विहीणबाई विहिणबाई उठा आता उठा
भातुकलीचा सार्‍या तुम्ही केला चट्टामट्टा !
पसाभर शेंगदाणे, पसाभर गूळ
एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ ?
खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा !
कुठुन मेलं बाहुलीचं लग्‍न काढलं आम्ही ?
विहीण म्हणून नशिबी आलात हो तुम्ही !
बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढा मोठा !
सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो
भिकार्‍यांशी नातं जोडुन बसलो !
वरमाईचा पोकळ नुसता पाहून घ्यावा ताठा !

बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू

बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू
झाडें, वेलीं, पशु, पाखरें यांशी गोष्टी करू
बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकुया या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवील फिरते फुलपाखरू
सुगरण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा
मासोळीसम बिनपायांचे बेडकिचे लेकरू
कसा जोंधळा रानी रुजतो, उंदीरमामा कोठे निजतो
खबदाडातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू
भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, कड्या दुपारी पर्‍ह्यात पोहू
मिळेल तेथून घेउन विद्या अखंड साठा करु

ये रे ये रे पावसा, रुसलास का ?

ये रे ये रे पावसा, रुसलास का ?
माझ्याशि गट्टी फू केलिस का ?
झर झर झर तू येणार कधी ?
अंगणात पाण्याची होईल नदी
ढगांच्या मागे असा लपलास का ?
गार गार वार्‍यांत नाचेन मी
खूप खूप पाण्यात भिजेन मी
विजेचि टाळि मला देतोस का ?
धुमधार पाण्यात रस्ता बुडेल
मग माझ्या शाळेला सुट्टी मिळेल
गड गड गड आतां हसतोस का ?

माझ्या छुगडीच्या बाहुलीचं लगीन, माझ्या छुगडीच्या

माझ्या छुगडीच्या बाहुलीचं लगीन, माझ्या छुगडीच्या
.-गडबड लग्‍नाची घाई, माझ्या छुगडीला काय यात फुरसत नाही !
उणे नको जरा कुठे पडायाला काही, अशी वेळ पुन्हा कधी काही येणारच नाही !
काळजीमुळे कामामुळे, लग्‍नाच्या ह्या व्यापामुळे, पोर गेली हो थकुन
समोरच्या शुभाचा बाहुला नवरा, न्‌ वरमाई शुभा तिचा ठसका न्यारा !
छुगडीला राग तिचा पाहून तोरा, पण करते काय ? तिचा बाहुला गोरा !
गोरा-गोरा बाहुला, त्याची सुंदर-सुंदर बाहुली, हा दिसतो जोडा कसा खुलुन
आमंत्रणं जाऊ द्यावी- ठायीठायी गेली, पाहुण्यांची गडबड आता घरी सुरु झाली !
मंडपही घातला न्‌ वाजंत्रीही आली, रोषणाई छानदार मंडपावर केली !
मानपान विहिणीला, कपडलत्ता खरेदीला, निघे छुगडी घाईनं
मायेपोटी माणसं सारी गोळा आता आली, मुंबईहुन आजोबा न्‌ गोंदियाची आत्या आली
पुण्याहुन भाऊ, वरणगावहून आजी आली, काका-काकू, मामा-मामी, मावशीही आली
जो-तो आता उत्सुकला, भरुनिया डोळा- सोहळा कधी पाहीन ?
अत्तरदाणी, गुलाबदाणी, पान-सुपारीचा- मिलिंद, अभय, मंगेश यांनी बंदोबस्त केला !
पुष्पा, मिनू, मंजिरीने, हळदी-कुंकू याचा- व्यवस्थित ! उणेपणा नाही येऊ दिला !
मंडपात दाटी झाली, मुहुर्ताची वेळ, चला लवकर, व्हा रे सावधान
अंतरपाट धरला बाहुली नि बाहुल्यात, हारतुरे तयार, अक्षताही मंडपात
मंगलाष्टकांनाही झाली आता सुरुवात-
(आता मंगल सोहळा, सुखद हा, कुर्यात सदा मंगलम्‌)
मंगलाष्टकांना झाली आता सुरुवात-, मधुनच भटजी काही मंत्र म्हणतात-
सावधान म्हणतात, टाळी-बँड वाजतात, अंतरपाट सारुन

या रे या सुजन, आपण सारेजण करू या भजन

या रे या सुजन, आपण सारेजण करू या भजन
भजन, भजन, भजन
दुरित हरण हरिचे चरण करू या स्मरण
स्मरण, स्मरण, स्मरण
ध्रुव चिलया प्रल्हादानी गाईली भक्तीची गाणी
प्रभू केला वश भजनानी काया-वाचा-मन, जाऊ सारेजण, प्रभूला शरण
शरण, शरण, शरण
वाजवू भक्तीचा डंका, प्रभूसी मारू हाका
मग नाही यमाचा धोका
होवू या पावन, आपण सारेजण करुनी भजन
भजन, भजन, भजन

THANKS FOR VISITING MY BLOG.

Thank you friends, we hope you like all these Marathi Balgeet. 

Post a Comment

0 Comments